नवी दिल्ली – सन 2047 सालापर्यंत दिल्लीचे दरडोई उत्पन्न सिंगापुरच्या बरोबरीला नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे. त्यांनी एका निवेदनाद्वारे आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत गेल्या सहा वर्षात जी कामगिरी केली आहे त्याचीही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या सहा वर्षात दिल्लीचा विकासाचा दर 11 ते 12 टक्के इतका झाला आहे. सध्याच दिल्लीचे दरडोई उत्पन्न एकूण राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या तिप्पट झाले आहे. सध्या दिल्लीतील एकूण दरडोई उत्पन्न 3 लाख 54 हजारावर गेले आहे. दिल्लीचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 4.4 टक्के इतका वाटा आहे.
सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बरोबर झालेल्या चर्चेच्यावेळी सिसोदिया यांनी दिल्ली सरकारच्या कामगिरी विषयी निवेदन केले आणि त्यांनी आज एका प्रसिद्धी पत्राद्वारे ही माहिती प्रसारीत केली. ते म्हणाले की दिल्लीचा जो एकूण जीडीपी आहे त्यातील 85 टक्के वाटा एकट्या सर्व्हिस सेक्टरचा आहे. ते म्हणाले की केजरीवाल सरकारने आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रातील सुधारणेवर आपले लक्ष केंद्रीत केले असून केंद्र सरकारने सहकार्य केल्यास या क्षेत्रात दिल्लीचा समावेश जगातील विकसित शहरांमध्ये होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जागेची उपलब्धता हा आमच्या समोरील विकासातील मोठा अडथळा आहे. त्यासाठी आम्हाला केंद्राच्या सहकार्याची गरज आहे असे ते म्हणाले.