नवी दिल्ली – अलीपूरमध्ये एका गोदामाची भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यांना बाहेर काढण्यासाठी पथके काम करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 9 जण जखमी झाले असून, 2 जण गंभीर जखमी आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून डेब्रिज हटवण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी दिल्लीतील अलीपूर येथील एका ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत कोसळली. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. मात्र, या अपघातात सुमारे 15 जण जखमी झाल्याचे अग्निशमन नियंत्रण कक्षाचे म्हणणे आहे.
Alipur wall collapse, Delhi | Of the 10 people rescued, 4 dead. The injured have been sent to the hospital. Rescue operation continues as some more people are feared trapped: Delhi Police pic.twitter.com/XwQccfjxZf
— ANI (@ANI) July 15, 2022
हा अपघात झाला तेव्हा जवळपास 25 मजूर घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान घटनास्थळी हजर आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्यातून आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
भिंत कोसळल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. या अपघातातील जखमींना जवळच्या हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळावरील ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी मशीन तैनात करण्यात आली आहे. तेथून जेसीबी मशिनच्या साहाय्याने डेब्रिज हटवण्यात येत आहे. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “अलीपूरमध्ये एक दुःखद दुर्घटना घडली. जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. मी वैयक्तिकरित्या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”