Delhi-Jaipur Bus Fire : राजस्थानच्या जयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या स्लीपर बसला भीषण आग लागण्याची घटना समोर आली आहे. या आगीत बसमधील दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचेस सांगण्यात येत आहे. तर १० ते १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जयपूरहून दिल्लीला जात असताना गुरुग्रामच्या सिग्नेचर फ्लायओव्हरवर ही घटना घडली आहे.
बसला लागलेल्या भीषण आगीमुळे त्यातील प्रवासी गंभीररीत्या भाजले गेले त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आगीमुळे बस पूर्णपणे जळून गेली आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत असून आग लागण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, बसला आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही.
#WATCH | Haryana: Latest visuals from the Delhi-Jaipur expressway in Gurugram where two people died after a bus was gutted in the fire. https://t.co/MlZZFKJwTj pic.twitter.com/guNWS72CKz
— ANI (@ANI) November 8, 2023
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरहून दिल्लीला जाणारी स्लीपर बस (AR 01 K 7707) बुधवारी मध्यरात्री गुरग्रामच्या सिग्नेचर टॉवर फ्लायओव्हरवर पोहोचली तेव्हा या बसने पेट घेण्यास सुरुवात केली. बसमधील प्रवाशांनी आरडा-ओरड सुरू केली. बस प्रवाशांनी भरली होती. पेटती बस पाहून त्या रस्त्याने जाणाऱ्या इतर लोकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला खूप मेहनत घ्यावी लागली. कारण संपूर्ण बस जळत होती.
या आगीत होरपळून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त वरुण दहिया म्हणाले, बुधवारी रात्री ही घटना घडली. घटनास्थळावरून होरपळून मृत्यू झालेल्या दोन प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आगीमुळे भाजलेल्या प्रवाशांना जवळच्याच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.