गुना – मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी सायंकाळी उशिरा डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला आग लागली. यामध्ये १३ जणांचा भाजून मृत्यू झाला आहे. डंपर चालकाचाही मृत्यू झाला आहे. या अग्निकांडात सुमारे १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरला धडकली. धडक होताच बसने पलटी होऊन पेट घेतला. दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बसमधील आगीवर मिळवण्यात यश आले. अपघातावेळी बसमध्ये एकूण सुमारे ३० प्रवासी होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी गुरुवारी दुपारी १२.३० वाजता गुना जिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आरटीओ रवी बरेलिया यांना निलंबित केले आहे. अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याने सीएमओ (मुख्य पालिका अधिकारी) बीडी कट्रोलिया यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
जखमी प्रवाशांच्या जबाबाच्या आधारे बसमालक भानू प्रताप सिकरवार, चालक आणि डंपर चालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये बस आणि डंपर चालकांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. वाहनांचे फक्त नोंदणी क्रमांक नोंदवले गेले आहेत. भानू प्रताप हे कंत्राटदार आणि भाजप नेते विश्वनाथ सिकरवार यांचे धाकटे भाऊ आहेत. विश्वनाथ हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.
मुख्यमंत्र्यांकडू मदतीची घोषणा
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, या हृदयद्रावक अपघातात अकाली मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो. या भीषण परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे.