नवी दिल्ली – दिल्लीतील एम्स म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रूग्णालयातील परिचारीकांनी आपल्या मागण्यांसाठी जो संप चालवला आहे त्याला हायकोर्टाने मनाई केली आहे. एम्सच्या व्यवस्थापनानेच परिचारीकांच्या या संपाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.
हा संप बेकायदा आहे आणि त्याने औद्योगिक कलह कायद्यातील कलमांचा भंग होतो आहे अशी भूमिका एम्सच्या व्यवस्थापनाने घेतली होती. ती ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने त्यांना संप करता येणार नाही असे म्हटले आहे. पुढील आदेश येई पर्यंत परिचारीकांना संप करता येणार नाही असा आदेश आज दिल्ली हायकोर्टाच्या एक सदस्य खंडपीठाने दिला आहे.
या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संपाला मनाई करण्याचा आदेश कोर्टाने या आधीच दिला आहे त्यामुळे या संपामुळे कोर्टाच्या आदेशाचा भंग होत आहे अशी भूमिकाही एम्सच्या व्यवस्थापनाने घेतली होती.