नवी दिल्ली – दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाने (डीएसएलएसए) बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाला ठोठावलेल्या 20 लाखांचा दंड वसुलीसाठी आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे अभिनेत्री जुही चावलाच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
5-जी तंत्रज्ञानाविरोधात खटला दाखल केल्याबद्दल जुही चावलासह अन्य दोघांना 20 लाखांचा दंड जमा करण्याचे निर्देश डीएसएलएसएने दिले होते. या याचिकेवर पुढील सुनावणी 3 फेब्रुवारीला होणार आहे.
अभिनेत्री जुही चावलाच्या वकिलांनी न्यायमूर्ती अमित बन्सल यांना सांगितले की एकल न्यायाधीशांच्या आदेशाविरुद्ध अपील विभागीय खंडपीठासमोर प्रलंबित आहे, ज्यावर 25 जानेवारी रोजी विचार केला जाईल आणि न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तूर्तास पुढे ढकलण्याची विनंती केली.
डीएसएलएसएचे वकील सौरभ कंसल यांनी, दंड आकारण्याचा आदेश जूनमध्ये मंजूर झाला होता आणि त्याचे पालन करणे बाकी आहे. तसेच डीएसएलएसएने वसुलीसाठी नोटीस बजावल्यानंतरच या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले गेले आणि खंडपीठाने कोणतीही स्थगिती दिली नाही, असा दावादेखील केला.