नवी दिल्ली – दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले आहे. ( CBI files chargesheet against seven accused, Manish Sisodia exempted) या प्रकरणी अटक केलेल्या दोन जणांसह एकूण 7 जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव नाही.
सीबीआयने हे आरोपपत्र दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केले आहे. या न्यायालयात मद्य धोरण घोटाळ्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, ज्या 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 3 सार्वजनिक सेवेत आहेत.
विजय नायर, अभिषेक बोईनपल्ली, समीर महेंद्रू, मुत्तथा गौतम, अरुण आर पिल्लई अशी तक्रार दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याशिवाय सीबीआयने उत्पादन शुल्क विभागातील दोन माजी अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव नाही. आता या आरोपपत्रावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीबीआयने सांगितले की, आरोपपत्रात दोन अटक व्यावसायिक, एका वृत्तवाहिनीचे प्रमुख, हैदराबादचे रहिवासी मद्यविक्रेते, दिल्लीचे रहिवासी मद्य वितरक आणि उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी यांचा समावेश आहे. सीबीआयची चौकशी अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआयने 10,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून आता पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे.