लस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने पाठवलेली पत्रं दाखवत उपमुख्यमंत्री सिसोदियांचे ‘गंभीर’ आरोप; म्हणाले…

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. राज्यात  ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या हृदयद्रावक  घटना समोर आल्या आहेत. दिल्लीतील वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पाहायला मिळतोय.

याबाबत काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्लीला दररोज ७०० मेट्रिकटन इतका ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी पुरवावा असे आदेश दिले होते. मात्र यानंतरही दिल्लीतील केजरीवाल सरकार विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार असा सामना पाहायला मिळतोय.

अशातच आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी, ‘भाजपतर्फे दिल्ली सरकारने दिल्लीकरांसाठी केवळ ५.५० लाख लसी मागवल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व दिल्ली सरकारदरम्यान लसींच्या पुरवठ्याबाबत झालेला पत्रव्यवहारही सादर केलाय.

याबाबत बोलताना सिसोदिया म्हणतात, “भाजपतर्फे आज दिल्ली सरकारने राज्यासाठी केवळ साडेपाच लाख लसींची ऑर्डर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. भारत सरकारने एप्रिल महिन्यात राज्य सरकारे देशातील दोन लसनिर्मात्या कंपन्यांकडून लसी विकत घेऊ शकतील असा निर्णय घेतला होता. याप्रमाणे दिल्लीसरकारने १८ ते ४४ वयोगटातील दिल्लीकरांचे लसीकरण करण्यासाठी १.३४ कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिली.”

“मात्र लस निर्मात्या कंपन्यांकडून कोणतेही उत्तर आले नाही. उलट केंद्र सरकारनेच या मागणीनंतर दिल्ली सरकारला एक पत्र पाठवत दिल्लीला कॅव्हॅक्सिन लसीचे ९२,८४० तर कोव्हीशील्डचे २,६७,६९० इतके डोस मिळू शकतील असं कळवण्यात आलं. त्यामुळे दिल्ली सरकारने केवळ साडेपाच लाख लसी मागवल्याचा भाजपने केलेला आरोप साफ खोटा आहे.” अशी बाजू सिसोदिया यांनी मांडली.

केंद्र सरकार राज्यांचा लस पुरवठा थांबवून इतर राष्ट्रांना लसी विकतंय

“केंद्र सरकारतर्फे पाठवण्यात आलेली ही पत्रं केन्द्र सरकार राज्यांनी मागणी केलेल्या लसींमध्ये कपात करून त्या लसी इतर राष्ट्रांना विकत आहे. आपल्या देशातील जनता मरत असताना कोणत्या हव्यासापोटी ६.५ कोटी लसी इतर राष्ट्रांना विकण्यात आल्या?” असा सवाल सिसोदिया यांनी यावेळी उपस्थित केला.       

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.