सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपट निर्माता करण जोहर नेपोटिझमच्या वादात अडकला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याला सध्या ट्रोल करण्यात येत आहे. करण जोहरविरोधात सुरू असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्याचे नाव “सूर्यवंशी’ या चित्रपटातून हटविण्यात आल्याची चर्चा आहे.
करण जोहर हा “सूर्यवंशी’ चित्रपटाचा निर्माता आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटातून करणचे नाव काढून टाकल्याची अटकळ आहे. पण याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. करण जोहर यांचे नाव सूर्यवंशीच्या निर्मात्यांच्या यादीतून काढल्याचे वृत्त चुकीचे असून यात सत्यता नाही, असे स्पष्टीकरण रिलायन्स एंटरटेनमेंटने दिले आहे.
“सूर्यवंशी’च्या रिलीज डेटबाबत सांगायचे झाल्यास अक्षयकुमारचा हा सिनेमा यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. करोना विषाणूमुळे हा चित्रपट अद्याप रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत आहे. सध्या देशभरातील चित्रपटगृहे अजूनही बंद आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत परिस्थिती ठीक होईल आणि सिनेमा हॉल सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
“सूर्यवंशी’मध्ये अक्षयसोबत कतरिना कैफ झळकणार आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयकुमार कॉपच्या अवतारात दिसल्याने त्याची खूपच चर्चा रंगली होती. यात अजय देवगण आणि रणवीर सिंह कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.