गायरानची पाहणी : विकास आराखड्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकर
स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
देहुरोड – दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या लोकसंख्येने तीर्थक्षेत्र देहूचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यासाठी विकास आराखड्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकर मार्गी लावावा, यासाठी हवेली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी गायरानातील जागेची पाहणी केली.
देहूतील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रकाराची दखल घेत प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. लवकरात लवकर प्रकल्पाचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, सरपंच पूनम काळोखे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव यावेळी उपस्थित होते.
देहूतील घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शासनाने त्यासाठी दोन कोटी रुपये विकास आराखड्यातंर्गत प्रस्तावित केलेले आहेत. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे आरेखन व आराखडा अहवाल एका संस्थेने तयार केला होता. मात्र त्यातील काही त्रुटी असल्याने त्याचे निराकरण करून तो पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु त्यांनी तो अहवाल सादर केला नाही. त्यामुळे हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यानिमित्ताने या प्रकल्पासाठीची प्रास्ताविक गायरानातील जागेची पाहणी करण्यात आली आहे.
या प्रकल्पाचा आराखडा नव्याने तयार करण्यात आला. आता तो नागपूर येथील घनकचरा व्यवस्थापन विषयातील अभ्यास करणाऱ्या संस्थेकडे तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यासाठी जागा उपलब्ध करावी लागणार असल्याने त्याजागेची पाहणी केली. त्यासाठी देहूला भेट दिल्याचे गटविकास अधिकारी शिर्के यांनी सांगितले. अहवाल प्राप्त होताच त्यात काही तांत्रिक दोष, त्रुटी असल्यास ते तात्काळ दूर करून फेर तपासणीसाठी पाठविण्यात येईल. अन्यथा त्या प्रकल्पाचे कामकाजाला सुरूवात करण्यात येईल, असेही या वेळी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे देहूत भाविकांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आलेली आहेत. परंतु स्थानिकासाठी स्वच्छतागृह नसल्याने भाविकांसह स्थानिकाची मोठी अडचण होत आहेत. त्यामुळे विविध जागांची पाहणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून जागा निश्चित करावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सभापती हेमलता काळोखे यांनी सांगितले.
संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे व माजी विश्वस्त अशोक महाराज मोरे यांनी देखील स्वच्छतागृह, पार्किंग समस्या व आठवडे बाजार या समस्यावर गटविकास अधिकारी शिर्के यांच्याशी चर्चा केली. गायरानातील विविध जागांवर झालेले अतिक्रमण याबाबत सरपंच पूनम काळोखे यांनी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. देहूतील विविध प्रश्नांकडे त्वरीत लक्ष देवून त्याचे निराकरण करण्याचे सरपंच काळोखे यांनी विनंती केली.