देहूगाव – श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतच्या प्रशासकीय ढिसाळ कारभाराने नागरिकांची विविध विकास कामे रखडली असून, छोट्या कामांकरिता नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
देहू ग्रामपंचायतीचे कार्यकाल संपल्यानंतर 22 ऑगस्टपासून प्रशासकीय कारभार सुरू झाला. त्यानंतर आठ डिसेंबर रोजी तीर्थक्षेत्र देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. नवनिर्वाचित सदस्यांची निवडणूक होईपर्यंत कामकाजासाठी प्रशासक नियुक्त करण्यात आले. नगरपंचायतीचे रूपांतर होऊ एक महिना उलटूनही अद्याप कामकाजाबाबत घडी बसली नसल्याचे दिसून येत आहे.
मिळकत कर भरलेल्या नागरिकांना नवीन नळजोड मिळत नाही.
मिळकत कर भरण्यासाठी आले असता कार्यालयात स्वीकारले जात नाही. नवीन मिळकतीची नोंद केली जात नाही. अशा अनेक तक्रारी नागरिक करीत असून, मिळकतीचे 8 अ प्रमाणपत्र, कामकाजासाठी लागणारे प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र आदी विविध दाखल्यांसांठी, किरकोळ कामासह तक्रारीकरता हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी करीत आहेत.
शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातील कृती आराखडा अंतर्गत संबंधित मंजूर कामे प्रलंबित असल्याचे तर ग्रामपंचायत काळातील प्रशासकीय मान्यता मिळालेली विविध नागरी सुविधेतील अत्यावश्यक विकास कामे प्रलंबित आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतनही झाले नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत असल्याने प्रशासनाने त्यावर ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
ग्रामपंचायत हस्तांतर करण्यासाठी ग्रामसेवकांनी वेळ लावला आहे. नवीन पावती पुस्तके छापली आहेत. पाणीपट्टी वसुलीचे अभियान सुरू करण्यात येणार आहे. घरपट्टी भरून घेण्यास आणि नवीन नळजोड अर्ज स्वीकारण्यास सांगितले आहे. याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. ग्रामपंचायत निवडणूक सुरू असल्याने मावळमध्ये 18 जानेवारीपर्यंत कामकाज करावे लागणार आहे. नायब तहसीलदार दिवसाआड देहू कार्यालयात येत आहे. ग्रामपंचायत काळातील फंड मंजूर झालेले कामकाज पूर्ण करता येतील. पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च करता येतील. ग्रामपंचायतीच्या काळातील कामांसंबधीत ठेकेदारांने काम पूर्णत्वाचा दाखला, प्रस्तावित कामांचे व खर्चाचे अहवाल, नकाशा त्यासंदर्भात संबंधित ग्रामसेवकाने पूर्णत्व करून कागदपत्रे हस्तांतरित केल्यानंतरच ते कामकाज पाहता येईल.
– मधुसुदन बर्गे, तहसीलदार तथा प्रशासकीय अधिकारी, मावळ