मुंबई – केंद्र सरकारच्या गॅस पाइपलाइनसाठी हजारो झाडे तोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यासंदर्भात गुरुवारी (1 मे) एक बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय त्यांनी ठाणे आणि बामणी गावापासून ते तेलंगणापर्यंत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठीही झाडे तोडण्याचे आदेश दिले आहेत.
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची (GAIL) गॅस पाइपलाइन बोर आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या कॉरिडॉरमधून जाणार आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून नागपूर ते मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंत द्रवरुप नैसर्गिक वायू वाहून जाणार आहे. ही पाइपलाइन 320 किलोमीटची असून यातील 24 किलोमीटरची लाईन व्याघ्रप्रकल्पातून जाते. त्यामुळे व्याघ्रप्रकल्पातील झाडे तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती.
यासंदर्भात राज्य वन्यजीव मंडळाची काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत निर्णय झाला नव्हता. पण केंद्र सरकारला गॅस पाईपलाईनसाठी तात्काळ मंजुरी हवी असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दुसरी बैठक घेत झाडे तोडण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये राज्य वन्यजीव मंडळाने बोर आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतील 14 हजार 241 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय वन्यजीव मंडळाने 220 केव्हीची ठाणे सॅटेलाइट लाइन मंजूर केली आहे. ही सॅटेलाइट ठाण्यातील खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या आतमधून 62 किलोमीटरमधून जाते. यासाठी 439 झाडे तोडण्यात येणार आहेत. यासह राज्यातील बामणी गावापासून ते तेलंगणापर्यंत राष्ट्रीय महामार्ग 930 डी च्या रुंदीकरणासाठी 6 हजार 805 झाडे तोडली जाणार आहेत.
ताडोबा-अंधारी-कन्हारगाव-इंद्रावत-कवळ या टायगर कॉरिडॉरमधून हा मार्ग जातो. तसेच ताडोबा-अंधारी-कवळ भागातील व्याघ्र कॉरिडॉरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353 बीच्या रुंदीकरणासाठी 5,140 झाडे तोडली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये एकूण चार प्रकल्पांसाठी झाडे तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.