मुंबई – राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. मात्र, जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कायम राहणार. तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे त्यांच्याकडे मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे.
मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव पदी बदली करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्वरीत पदभार स्विकारावा, असे फर्मान सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.
नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अपर मुख्य सचिव(गृह) पदावर सैनिक यांची बदली करण्यात आली आहे. या पदावर दिनेश वाघमारे कार्यरत होते. आता सैनिक यांच्याकडे या पदी काम करतील.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची म्हाडामध्ये बदली करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जयस्वाल हे काम करतील. अनिल डिग्गीकर हे या पदावर कार्यरत होते. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाचे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.