पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी दीपक पवार यांची वर्णी

सातारा – सातारा जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेते दीपक साहेबराव पवार यांची पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आज निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री. पवार यांची ही निवड केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही वार्ता भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीला गुरूवारी सकाळी कळवल्यानंतर पवार यांच्या कमानी हौद व सदर बझार येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांची गर्दी झाली होती.

दीपक पवार यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रिपद मिळाले आहे. दीपक पवारांच्या निवडीमुळे जावळी तालुक्‍याला बऱ्याच वर्षानंतर लाल दिवा मिळाला आहे.
दीपक पवार मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव करीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याची हॅट्रिक साधली होती.

जिल्ह्यात भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. गेल्या तीन वर्षात भाजपच्या संघटनात्मक बांधणीत पवारांचा मोठा वाटा राहिला आहे. साताऱ्याच्या होमग्राउंडवर भाजपचा दबदबा ठेवण्याची राजकीय तजवीज पवारांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दीपक पवार यांची महामंडळ अध्यक्षपदी निवड करून पवारांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेतली आहे.

पवार यांच्या निवडीमुळे जावली तालुक्‍यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवार यांच्या निवडीचे स्वागत करून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे गटनेते मिलिंद काकडे, धनंजय जांभळे, सिध्दी पवार, प्राची शहाणे, आशा पंडित, ऍड प्रशांत खामकर, किशोर गोडबोले, दत्ताजी थोरात, विठ्ठल बलशेटवार, सातारा तालुकाध्यक्ष अभय पवार यांनी दीपक पवार यांचे अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.