आठ विधानसभा मतदारसंघ ताकदीनिशी लढणार : साळवी

माने यांचा बोलविता धनी वेगळाच

वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली हे साळवे यांना विचारले असता, वंचित आघाडी फोडण्याचे काम दोन्ही कॉंग्रेस करत आहे. त्यांचे हे प्रयत्न आम्ही उधळून लावण्यास सक्षम आहोत असे म्हणत लक्ष्मण मानेचा बोलवता धनी वेगळाच आहे. त्यांच्या जाण्याने पक्षात अजिबात फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कराड – येणाऱ्या विधानसभेसाठी राज्यात चाचपणी सुरू आहे. यासाठी सातारा, सांगली व कोल्हापूर येथे पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरू आहेत. वंचित आघाडीसाठी चांगले वातावरण असून जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ वंचित पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रवर्तक धर्मराज साळवी यांनी दिली. येथील विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, अनिल सावंत, शब्बीर शेख यांसह वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धर्मराज साळवी म्हणाले, प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कोण-कोणत्या जागेवर दावेदारी असणार यासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत.काही दिवसांपासून सातारा-सांगली कोल्हापूर येथे दौरे सुरू केले असून पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठका घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात 8 पैकी कराड दक्षिण, वाई, खंडाळा, कोरेगाव व फलटण या चार विधानसभा मतदारसंघात वंचितला यश मिळण्याची अपेक्षा आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवैसी यांच्या पाठीशी राज्यातील जनता उभी असल्याचे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आले. लोकसभा हा तर ट्रेलर होता, विधानसभेला पूर्ण पिक्‍चर पहावयास मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने वंचितांची प्रतारणा केली होती. त्यांना निवडणुकीत संधी दिली नाही. आता मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीलाच त्यांचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे. यांना आता वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही हे समजून आले आहे, असे सांगत दोन्ही कॉंग्रेसवर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)