प्रादेशिकच्या नावाखाली करवडी पाण्यापासून वंचित 

दोन दिवसात मार्ग न काढल्यास 29 रोजी बेमुदत उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा

कराड – करवडी तालुका कराड येथील पाणीपुरवठ्याची टाकी जीर्ण झाली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. केवळ प्रादेशिक पाणी योजनेची टाकी असल्याने मंजूर झालेली नवीन टाकी बांधता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याविना मोठे होल होत आहेत.

पंचायत समितीने लवकरात लवकर यावर मार्ग काढावा अन्यथा 29 रोजी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा, करवडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांना नुकतेच देण्यात आले आहे. सरपंच धनाजी पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी, हिंदुराव पिसाळ, मनोज माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी करवडी गावाचा सदाशिवगड प्रादेशिक पाणी योजनेत समावेश करण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सदाशिवगड पाणीयोजना इतर प्रादेशिक योजनांप्रमाणे बंद आहे. या योजनेत समाविष्ट असणाऱ्या सर्व गावांनी पाणी पुरवठ्याच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पाणीप्रश्‍न सुटला आहे.

करवडी गावास पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची मुख्य टाकी कालबाह्य झाली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. ही टाकी धोकादायक असल्याचे ग्रामपंचायतीने यापूर्वीच जाहीर करून तसा फलकही तेथे लावला आहे. जुनी टाकी धोकादायक असल्याने ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेतून टाकी बांधण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिलेला आहे. मात्र प्रादेशिक योजनेत गावाचा समावेश असल्याचे कारण पुढे करत नवीन टाकी बांधता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

जीर्ण झालेली टाकी केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे ती पाण्याची टाकी तात्काळ पाडून तेथे नवीन टाकी बांधणे गरजेचे असताना प्रादेशिक योजनेचे कारण पुढे केले जात असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्‍त होत आहे. अनेकवेळा पंचायत समितीत फेऱ्या घालूनही अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठविले असलेल्याचे उत्तर दिले जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या सततच्या उत्तरांना कंटाळून ग्रामस्थांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून करवडी येथे नवीन टाकी बांधण्याची मागणीस मंजुरी द्यावी अन्यथा सोमवार दि. 29 रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.