दीनदयाळ उपाध्याय विमा योजना करदात्यांच्या फायद्याची

करदात्यांना अपघात विमा कवच देणारी पुणे महापालिका देशात एकमेव


“पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने’चे नऊ लाख कुटुंबांना संरक्षण

पुणे – नियमितपणे आणि निर्धारित कालावधीत निवासी मिळकत कर भरणाऱ्या करदात्यांना विमा कवच देणारी पुणे महापालिका ही देशातील एकमेव महापालिका ठरली आहे. 2018 मध्ये सर्व निवासी मिळकतधारक कुटुंबांसाठी जाहीर केलेल्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने’ची व्याप्ती 2019 मध्ये वाढवून त्यात गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवा शुल्क भरणारी झोपडपट्टीतील कुटुंबेही समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे सुमारे 9 लाखांहून अधिक कुटुंबे या योजनेच्या कक्षेत आली आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत एकूण 3.65 कोटी रुपयांची विम्याची रक्कम अपघातग्रस्त मिळकतधारकांना दिली गेली आहे. देशातील एकमेव असलेल्या या अभिनव योजनेची माहिती सर्व पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचावी, यावर महापालिका विशेष भर देत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात नियमित व निर्धारित कालावधीत निवासी मिळकत कर भरणाऱ्यांसाठी ही योजना सर्वप्रथम मांडली गेली. 2018-19 पासून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. 2019-20 मध्ये निवासी मिळकतधारकांबरोबरच गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवा शुल्क भरणाऱ्या झोपडपट्टीतील कुटुंबांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले.

शहरातील एकूण नऊ लाखांहून अधिक निवासी मिळकतधारक व झोपडपट्टीधारक या विमा योजनेसाठी पात्र असून, या योजनेअंतर्गत मिळकतधारकाला अपघात झाल्यास कुटुंबास पाच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबातील व्यक्तीचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला, तर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात संपर्क साधल्यास मदत मिळू शकते.

अपघाती मृत्यू झाल्यास मिळकत कर किंवा गलिच्छ वस्ती निर्मूलन शुल्क भरल्याची पावती, मृत व्यक्ती व वारसदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, पोलिसांकडील तक्रार, उत्तरीय तपासणी अहवाल, पोलिसांचा पंचनामा, मृत्यू दाखला, रेशन कार्ड, क्‍लेमसाठीचा अर्ज व त्या अनुषंगाने लागणारी इतर कागदपत्रे सादर करावी लागतात.

अपघाताने अपंगत्व आल्यास वरीलपैकी लागू होत असलेल्या कागदपत्रांसह जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयातून अपंगत्वाचा दाखला, रुग्णालयातील डिस्चार्ज समरी व संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. अपघातात जखमी झाल्यास आर्थिक मदत मिळण्यासाठी त्या अनुषंगाने इतर कागदपत्रे महापालिकेकडे सादर करावी लागतात.

पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी मदत
मिळकतधारकाचा मृत्यू : 5 लाख रुपये – मिळकतधारकाच्या पती अथवा पत्नीचा मृत्यू : 5 लाख रुपये – मिळकतधारकावर अवलंबून असलेल्या 23 वर्षांखालील पहिल्या दोन अपत्यांपैकी एकाचा मृत्यू : 2.5 लाख रुपये – मिळकतधारकाच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू : 2.5 लाख रुपये – मिळकतधारकावर अवलंबून असलेल्या दिव्यांग बालक, घटस्फोटित मुलगी किंवा अविवाहित मुलीचा मृत्यू : 2.5 लाख रुपये – रुग्णवाहिकेसाठी : तीन हजार रुपये

करदाता हा शहरविकासाचा समान भागीदार आहे. आपला कर प्रामाणिकपणे भरून शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या प्रत्येक करदात्याला अपघात विम्याचे कवच देणे, हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.