जामखेड – शहरातील दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना एका तरुणाने बनावट ऑनलाइन पेमेंट कन्फर्मेशन मेसेज दाखवून 6 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार जामखेडमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे ऑनलाइन पैसे घ्यावेत की नाही, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील जयहिंद चौकातील रामदेवजी शू मार्ट येथे एक तरुण नामांकित कंपनीचा बूट खरेदी करण्यासाठी आला होता.दुकानाचे मालक चेतन राळेभात यांनी तरुणाला बूट दाखवला. तरुणाने कोणतीही घासाघीस न करता सुमारे 2 हजार रुपयांचा बूट पसंत केला.त्यानंतर ऑनलाइन पैसे टाकतो म्हणत तरुणाने राळेभात यांना 2 हजारांचे ऑनलाइन पेमेंट कन्फर्मेशन झाल्याचा मेसेज दाखवून बूट घेऊन पसार झाला.मात्र, बराच वेळ होऊनही पेमेंट जमा झाल्याचा मेसेज राळेभात यांना न आल्याने त्यांना शंका आली. त्यांनी पडताळणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो पर्यंत तो तरुण पसार झाला होता.
त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही पाहिले असता त्या तरुणाच्या हातात शहरातील रुबाब मेन्स वेअर या कपड दुकानाची पिशवी होती. याबाबत राळेभात यांनी दुकानदार शुभम राळेभात यांच्याशी संपर्क करून तुमच्या दुकानात एका तरुणाने कपडेवैगरे खरेदी केल्याची चौकशी केली असता रुबाबचे संचालक शुभम राळेभात यांनी एका तरुणाने 3 हजार रुपयांचे कपडे खरेदी केले व ऑनलाइन पेमेंट कन्फर्मेशन झाल्याचा मेसेज दाखवून तो गेला असे सांगितल्यावर त्यांनी पैसे जमा झाले की नाही याची खात्री केली असता त्यांनाही पैसे आले नसल्याचे दिसले. त्यामुळे आपलीही फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. रक्कम किरकोळ असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र, शहरात बनावट ऑनलाइन पेमेंट कन्फर्मेशन मेसेज दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.
अशी घ्या काळजी
– पैसे प्राप्त झाल्यानंतर मोबाइलवर आलेला मेसेज तत्काळ तपासा.
– पैसे खात्यात जमा झाल्यानंतर मशिनवर येणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्या.
– मोबाइल स्क्रीनशॉटपेक्षा पैसे जमा झाल्याच्या मेसेजवर बारकाईने लक्ष द्या.