पुणे – पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी आली असून याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इलेक्शनला उभे राहू नका, अन्यथा गोळ्या घालून मारू असे धमकी देणाऱ्याने म्हंटले आहे.
याबाबत अविनाश रमेश बागवे (४६, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.४) दुपारी बागवे यांच्या मोबाईल नंबरवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यामध्ये जल्दी से पैसे भेज वरणा जान से मार देंगे, असे म्हंटले होते. आपण खराडी मधून मुस्कान शेख बोलत असून ३० लाख रुपये पाठवून दे, नाहीतर तुला मारण्यासाठी माझी माणसे तयार आहेत, असेही म्हणण्यात आले होते.
दोन दिवसांत पैसे दिले नाहीतर तुला खल्लास करू, असे बागवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबतचा अधिक तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर करत आहेत. पुण्यात नुकतीच भाजप नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे खंडणीची मागणी करून त्यांना धमकी देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर आता काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला देखील धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.