मुंबई – उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केल्यानंतर ठाकरेंच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर याला पुष्पा स्टाईलने उत्तर देत “आम्ही फडतूस नाही तर काडतूस आहोत.. झुकेगा नही.. घुसेगा” असं फडणवीस म्हणाले. आता फडणवीसांच्या या प्रत्युत्तरावर ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी भिजलेली काडतूस या महाराष्ट्रात खूप पाहिली असा खरमरीत टोला यावेळी राऊतांनी फडणवीसांना लगावला.
“उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हूँ मै.. झुकेगा नहीं साला.. घुसेगा” असं म्हणत फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला होता.यावर आता राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं.आम्ही कुठे म्हंटल झुका म्ह्णून.. हे एवढे वाकले आहेत कि वाकून वाकून मोडून पडले आहेत. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
‘फडतूस’ हा शब्द मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे. डिक्शनरी पहा जरा त्यामध्ये फडतुसाचा अर्थ असा आहे.मिनींगलेस.. वर्थलेस.. युजलेस.. बिनकामाचे लोक. हे सरकारच बिनकामच आहे त्यासाठी फडतूस शब्द वापरला असं स्पष्ट मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
भिजलेलं काडतूस एवढं आतमध्ये जाण्याचं कारण नाही. तुम्ही काडतूस असाल ओ.. अशी भिजलेली काडतूस आम्ही या महाराष्ट्रात खूप पाहिली. तुमचं खरं काडतूस सीबीआय आणि ईडी आहे म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे. अशी जळजळीत टीका राऊत यांनी यावेळी केली.