श्रीगोंदा – पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग येऊन अनिल वसंत सोमवंशी (रा. शिरसगाव बोडखा) यांनी घरी जाऊन शिवीगाळ करत दमदाटी तसेच धक्काबुक्की करीत तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलगा प्रवीण शेलार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अनिल वसंत सोमवंशी याला अटक केले.
शिरसगाव बोडखा येथील अनिल वसंत सोमवंशी याचे त्याच्या पत्नी सोबत झालेल्या घरगुती वादात बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलाने मध्यस्ती करीत त्यांचा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा राग येऊन आरोपी अनिल सोमवंशी याने दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेलार यांच्या वडळी येथील घरी दारु पिऊन जात फिर्यादी यांना पती पत्नीच्या घरगुती वादात का मध्ये पडता असे म्हणुन शिवीगाळ करीत दमदाटी करुन फिर्यादीस धक्काबुक्की केली. तसेच तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देवुन आमचे भांडणात परतमध्ये आले तर मी तुला तलवारीने कापुन टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.