नगर– महापालिकेतील जाहिरात कर विभागाच्या अनागोंदी कारभाराला अखेर चाप बसला आहे. या विभागाच्या प्रमुखांकडून जाहिरात फलक व होल्डींग लावण्याच्या मंजूरीचे अधिकारी काढून घेण्यात आले असून ते काम आता अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे देण्यात आले आहे.
अतिक्रमण हटाव कारवाईवेळी पथकाला शहरातील अनधिकृत होल्डींगची माहिती न देणाऱ्या जाहिरात कर विभाग प्रमुखाकडून या विभागाचे कामकाज काढून घेण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले. त्यामुळे आता जाहिरात कर विभाग प्रमुखाने पितळ उघडे पडले आहे.
शहरात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने जाहिरातीचे होल्डींग लावले जात असताना महापालिका प्रशासनाकडे मात्र अवघ्या दीडशे ते दोनशे होल्डींगलाच परवानगी असल्याची माहिती समोर आली आहे. या विभागाचे प्रमुख सुबोध देशमुख यांच्याकडे किती होल्डींगला परवानगी आहे, याची माहितीही उपलब्ध नाही. काही दिवसांपूर्वी प्रोफेसर कॉलनी चौक येथे फलक काढण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावेळीही देशमुख यांनी कोणतीच माहिती दिली नव्हती. तसेच, न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगी दिलेल्या प्रत्येक फलकावर बार कोड बंधनकारक केलेला आहे. त्यासाठी वेब प्लिकेशन तयार करणे अपेक्षित होते. याची साधी माहितीही या विभाग प्रमुखाला नसल्याचे उपायुक्त अजित निकत यांच्या तपासणीत समोर आले. अनधिकृत होल्डींगवर कारवाईच्या दृष्टीने कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर या विभागाचे काम देशमुख यांच्याकडून काढून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सोपवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शहरात केवळ चंगेडिया आऊटडोअर या एकाच कंपनीला परवानगी दिलेली आहे. इतर कंपन्यांचे सर्व होल्डींग अनधिकृत आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर देशमुख यांनी आणखी एका कंपनीचा प्रस्ताव घाईघाईने परवानगीसाठी सादर केला आहे. त्यामुळे शहरात अनधिकृत होल्डींग असल्याचे माहिती असूनही, त्यावर जाणीवपूर्वक कारवाई न करणाऱ्या देशमुख यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.