तळेगाव ढमढेरे -येथील पांढरी वस्तीवरील एका शेतामध्ये आढळून आलेल्या मोराचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. मोराचे शवविच्छेदन करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे येथील पांढरीवस्ती येथे महेश भुजबळ यांच्या शेतामध्ये एक मोर पडलेला असल्याची माहिती महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे प्राणीमित्र शेरखान शेख यांना मिळाली. त्यांनतर त्यांनी वनविभागाच्या वनरक्षक अनिता होले यांना फोन करून माहिती दिली.
वनरक्षक अनिता होले यांनी तळेगाव ढमढेरे येथे धाव घेऊन भुजबळ यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यांना तेथे उसाच्या शेतात एक नर जातीचा मोर पडलेला दिसला. त्यावेळी वनरक्षक अनिता होले यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून माहिती देली. मोराला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी केली. परंतु उपचारापूर्वीच मोराचा मृत्यू झाला होता.
त्यांनतर मोराचा पंचनामा करीत त्याचे शवविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले. यावेळी शवविच्छेदन अहवालानुसार मोराचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे.
सध्या उन्हाची तीव्रता असून पशु पक्षांच्या अन्न पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण असल्यामुळे प्रत्येकाने पशु- पक्षांना पाण्याची व्यवस्था करून घरावर पाणी ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे प्राणीमित्र शेख व सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी केले आहे.