पिंपरी, (प्रतिनिधी) – फ्रीजला करंट लागत असल्याचे माहीत असून देखील एका 17 वर्षीय कामगाराला फ्रीजवर चढून काम करण्यास सांगितले. यामुळे मुलाला शाॅक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 11) तळवडे येथील येवले चहा येथे घडली आहे.
यावरून तळेवडे येथील येवले चहा चालक गणेश जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रेमकुमार सिद्धराम बनसोडे (वय 43, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. मुलाचे वय 17 आहे हे माहीत असून देखील आरोपीने मुलाला कामावर ठेवले. तसेच दुकानातील फ्रीजचा बॉडीमध्ये करंट उतरत असल्याचेही आरोपीला माहिती होते.
कामगारांच्या सुरक्षितते बाबत आरोपीने कोणतीही उपाययोजना केली नाही. उलट फिर्यादीच्या मुलाला सोमवारी फ्रीजवर चढून चहाचे कप काढण्यास सांगितले. यामुळे फिर्यादीच्या मुलाला जोरदार करंट लागला. त्यात फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यावरून अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या कामावर ठेवणे तसेच कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.