माजगाव फाट्यावरील अपघातात साताऱ्यातील युवकाचा मृत्यू

नागठाणे  – पुणे- बंगळुरू महामार्गावर माजगाव फाटा (ता. सातारा) येथे होंडा सिटी कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. कारमधील अन्य चार युवक गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. मनीष सुभाष मगर (वय. 20, रा. संभाजीनगर, एमआयडीसी, सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा येथील मनीष मगर हा युवक अन्य चार युवकांसोबत होंडा सिटी कार (एम. एच. 11. बीबी. 2233) घेऊन महामार्गावरील खोडद फाटा येथील हॉटेल सिमरनजीत ढाबा हॉटेलवर मंगळवारी रात्री उशिरा जेवण करण्यासाठी गेले होते.

जेवण आटोपल्यावर बुधवारी पहाटे दोनच्या दरम्यान हे पाचही जण होंडा सिटी कारने पुन्हा सातारकडे निघाले होते. कार माजगाव फाटा येथे आली असता चालकाचे भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरच पलटी झाली व तशीच जोरात फरफटत महामार्गाच्या पश्‍चिम बाजूला असलेल्या झाडाला आडवी जाऊन जोरात आदळली.

कार पलटी होऊन जोरात आदळल्याने छताचा पत्रा व कारच्या मध्येच सर्व युवक अडकले गेले होते. यावेळी महामार्गावरील अन्य वाहनचालकांनी वाहने थांबवून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. याचदरम्यान अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस व जनता क्रेन व रुग्णवाहिकेचे अब्दुल सुतार यांनी मोठ्या प्रयत्नाने कारचा पत्रा बाजूला करून गंभीर जखमी झालेल्या सर्व युवकांना उपचारासाठी सातारा येथे खासगी रुग्णालयात पाठविले. मात्र, मनीष सुभाष मगर या युवकाचा मृत्यू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाला होता. अन्य चार गंभीर जखमी युवकांवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात होंडा सिटी कारचा चक्काचूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.