लोणंद -लोणंद-फलटणरोडवर दुचाकी आणि ऊसाच्या ट्रॉलीमध्ये झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलगी ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी होऊन ठार झाली. राहूल राजू कुसळकर हा अल्पवयीन मुलीला घेऊन पळून निघाला असताना हा अपघात झाला. याप्रकरणी राहूलवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, राहूल राजू कुसळकर हा लोणंद-फलटण रस्त्याने अल्पवयीन मुलीला आपल्या दुचाकीवरुन घेऊन निघाला होता. यावेळी साखरवाडी कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॉलीला त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेली अल्पवयीन मुलगी ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने तिला
पुढील उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सदर अल्पवयीन मुलीला राजू कुसळकर याने पळवून नेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असून राहुल कुसळकर याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रमेश शंकर आवारे (वय 42, रा. पवारवाडी, ता. फलटण) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून लोणंद पोलीस अधिक तपास करत आहेत.