Supriya Sule – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज वाढदिवस. देशभरातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील खास पद्धतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात एक गट भाजपसोबत गेला आहे. तर, दुसरा गट शरद पवारांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीत आहे. या संघर्ष काळात सर्व अडचणींवर शरद पवार मात करतील , असा विश्वास सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट
“आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती. मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत.
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण… pic.twitter.com/IJvh46iMyv
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2023
जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !” याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे टिपलेला स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला आहे.
दुसरीकडे, शरद पवार आज नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेतून शरद पवार केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागण्याची शक्यता आहे.