मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. इक्बालला आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती.
काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली, त्यानंतर ईडीने इक्बाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यानंतर इक्बालला ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर आता न्यायालयाने इक्बालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास ईडी करत आहे.
दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. याच प्रकरणी ईडीने 2 बिल्डरांना समन्स पाठवले असून, त्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपींनी डिजिटल वॉलेट आणि डार्कनेटचा वापर करून पैसे ट्रान्सफर केले आहेत. या संपूर्ण प्रणालीचा वापर 2019 च्या सुमारास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. युएईतील काही एजन्सींमार्फत हा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.