Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याच्या बातम्यांनी काल दिवसभर ऊत आला होता. याविषयी पहिली बातमी पाकिस्तानमधून सगळ्या जगात पसरली. मात्र आता दाऊदच्या तब्बेतीविषयी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दाऊदचा हस्तक म्हणून ओळखला जाणारा छोटा शकीलने दाऊद इब्राहिम १००० टक्के तंदुरुस्त असल्याची माहिती दिली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने या संदर्भात माहिती दिली आहे. दाऊद इब्राहिमच्या मृत्यूबाबत आताच नाही तर मागे अनेक वेळा खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. पाकिस्तानातील समाज माध्यमांवरील वाहिन्यांनी दाऊद इब्राहिम रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिल्यामुळे दिवसभर याविषयी चर्चा सुरू होती.
पाकिस्तानात दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यात देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. परंतु, याबाबत छोटा शकीलने मोठा खुलासा केला आहे. “भाईच्या मृत्यूची अफवा निराधार आहे. तो १००० टक्के तंदुरुस्त आहे. खोडकर हेतुने कोणीतरी ही अफवा पसरवली”, असे छोटा शकीलने एका इंग्रजी वर्तमापत्राला सांगितले.
छोटा शकील सध्या डी कंपनीचे कामकाज पाहत आहे. डी कंपनीची स्थापना दाऊदने केली होती. शकील जेव्हा पाकिस्तानात गेला होता तेव्हा दाऊद एकदम सुस्थितीत होता. दाऊदला विषबाधा झाल्याचे वृत्त गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनीही फेटाळले. दाऊदला चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो.