ICC Cricket World Cup 2023 : विश्वचषकात खराब सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने शानदार पुनरागमन केले आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुढील तीन सामन्यांमध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचा या विश्वचषकातील तिसरा विजय अतिशय खास होता, कारण त्यांनी नेदरलँड्सचा 309 धावांनी पराभव केला आणि धावांच्या फरकाने विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाच्या या विजयात दोन खेळाडूंनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यांची नावे आहेत डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल. आधी डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले आणि त्यानंतर मॅक्सवेलने अवघ्या 40 चेंडूत विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 399 धावांपर्यंत नेली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वॉर्नर आणि मॅक्सवेल या दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, पण दिल्लीच्या मैदानावर सामन्यादरम्यान सुरू असलेल्या लाईट शोवर दोन्ही खेळाडूंचे मत भिन्न होते.
भारतात सुरू असलेल्या ICC विश्वचषक 2023 दरम्यान, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी स्टेडियममध्ये ड्रिंक ब्रेक दरम्यान लाइट शो आयोजित केला जात आहे. स्टेडियमवर केलेली रोषणाई प्रेक्षकांना खूप आवडली आहे. कारण हे दृश्य खूपच मनमोहक असते. एक खेळाडू म्हणून मॅक्सवेलला हे आवडले नाही आणि त्याने आपले मत उघडपणे मांडले, परंतु त्याचा संघातील सहकारी डेव्हिड वॉर्नरने याविषयी मॅक्सवेलविरोधात वक्तव्य केले आहे.
मॅक्सवेलचे मत..
नेदरलँडविरुद्धच्या सामन्यानंतर मॅक्सवेललाही सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्या सामन्यानंतर मॅक्सवेलने दिल्लीच्या मैदानावर नाईट क्लब सारख्या लाइट शोबद्दल चर्चा केली आणि म्हणाला, “लाईट शो ही खूप वाईट कल्पना आहे. याने डोकेदुखी होते. यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोळ्यांना जुळवून घ्यायला वेळ लागतो. हे क्रिकेटपटूंसाठी योग्य नाही. ही आतापर्यंतची सर्वात वाईट कल्पना आहे. होय, चाहत्यांसाठी ती छान आहे, पण खेळाडूंसाठी ती भयानक आहे.”
I absolutely loved the light show, what an atmosphere. It’s all about the fans. Without you all we won’t be able to do what we love. 🙏🙏🙏 https://t.co/ywKVn5d5gc
— David Warner (@davidwarner31) October 25, 2023
वॉर्नरचे मत…
मात्र, दिल्लीत नेदरलँड्सविरुद्ध शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचे यावर मत वेगळे आहे. डेव्हिड वॉर्नर म्हणाला, मला लाईट शो खूप आवडला. फार छान वातावरण होतं. हे सर्व काही क्रिकेट चाहत्यांसाठीच आहे. तुम्ही स्टेडियममध्ये नसाल तर सामन्यात मजा येणार नाही. तुम्ही सर्व (चाहते) नसाल तर आम्ही सर्वजण आम्हाला जे आवडतं ते (क्रिकेट खेळणं) करु शकलो नसतो,’