लखनऊ – तांत्रिक-मांत्रिकांच्या नादी लागून अनेकजण उद्धवस्त झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील एका महिलेने काळ्या जादूच्या नादी लागून आपल्या दिव्यांग सासऱ्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलिसांनी सूनेला ताब्यात घेतले असून काळ्या जादूच्या नादी लागून सासऱ्याचा गळा दाबून खून केल्याची कबूली सुनेने दिली आहे.
उत्तर प्रदेशातील कौशंबीतील सराय अकील भागात एका दिव्यांग वृद्धाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. भगवान दास असे हत्या झालेल्या दिव्यांगाचे नाव आहे. गुरूवारी रात्री घराबाहेर झोपलेले असताना त्यांची हत्या झाली होती. त्यावेळी घरातील सर्वजण एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर भगवान दास हे मृतावस्थेत दिसून आले होते. घटनेची माहिती समजताच गावात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. भगवान दास यांची सून घरात होती. पोलीसांना तिच्यावर संशय आला. तसेच घटनास्थळी बाजूलाच तंत्रमंत्राचे साहित्य असल्याने भगवान दास यांचा बळी दिल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. दास यांच्या सुनेला ताब्यात घेऊन कसून चौकशी करताच तिने हत्येची कबुली दिली.
महिलेने दिलेल्या जबाबाने पोलीसही चक्रावले. देवीला प्रसन्न करून सिद्धी मिळवण्यासाठी आपण सासऱ्यांचा बळी दिल्याचे तिने पोलीसांना सांगितले. तिच्या अंगात देवीचा संचार आहे. देविच्या सांगण्यानुसार आपण कोणतेही काम करू शकतो, असे तिने गावकऱ्यांना सांगितले होते. पोलीसांनी महिलेला न्यायालयीन कोठडीत पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.