थिरूवनंतपूरम – सहा महिन्यांनतर भाविकांच्या दर्शनासाठी शबरीमला मंदिर उघडण्यात आले आहे. शनिवारपासून मासिक पूजेसाठी हे मंदिर पाच दिवस खुले राहील.
त्रावणकोर मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार, हे देवस्थान शुक्रवारी दुपारी पाच वाजता उघडण्यात आले. मात्र भाविकांना शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी सोडण्यात येईल. भाविकांनी मंदिरात येण्यापुर्वी 48 तास आधी घेतलेले करोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र प्रवेशासाठी बंधनकारक आहे. व्हर्च्युअल क्यूद्वारे नाव नोंदणी केल्यानंतर दर्शनाची वेळ सांगण्यात येईल, असे मुख्यमत्री पी. विजयन यांनी सांगितले.
त्यांनीही वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले आहे. त्यामुळे मी दर्शनासाठी जाऊ शकतो, असे पत्रकारांना सांगितले. प्रत्येक दिवशी केवळ 250 भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तेथे पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दहा वर्षाखालील आणि 60 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. भाविकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग वापरावे असे ते म्हणाले.