पाचगणी – दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलच्या वरील बाजूच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने या ठिकाणी असणाऱ्या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने आज सायंकाळी याबाबत पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश तातडीने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की पाचगणीपासून केवळ एक किलोमीटरवर असणाऱ्या दांडेघर हद्दीतील ब्लूमिंग डेल हायस्कूल इमारतीच्या वरच्या बाजूला असणारा डोंगर (सर्व्हे नंबर 23/6) आज अतिवृष्टीने सुमारे अडीच फूट खाली खचला असून डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. हा डोंगर पावसाने खचला असल्याचे उपसरपंच जनार्दन कळंबे यांच्या निदर्शनास आले. आज सायंकाळी तलाठी निलेश गीते, दीपक पाटील यांनी उपसरपंच जनार्दन कळंबे, अशोक कासुर्डे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.
यावेळी येथील परिस्थितीची पाहणी करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीला धोका असल्याने अधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांना तातडीने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या भेगांमुळे शाळेलगत असणारी दरड पाण्याच्या टाकीजवळ आली आहे. तर एक वृक्षही यामध्ये उन्मळून पडला आहे.