पाच हजाराची लाच घेताना वाहतूक पोलीस रंगेहाथ पकडला

लोणी काळभोर  – ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला रंगेहाथ पकडून त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायदा कलमान्वये कारवाई केली आहे.

लोणीकाळभोर येथील वाहतूक शाखेचे पुणे शहरचे पोलीस शिपाई सुहास भास्कर हजारे (वय 35) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार हे ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या एजन्सीच्या बसेस स्वारगेट (पुणे) ते सोलापूर अशी प्रवासी वाहतूक करतात.

तक्रारदार यांच्या ट्रॅव्हल्सच्या बसेस या मार्गावर चालवायच्या असतील तर कारवाई न करण्यासाठी दरमहा 6 हजार रुपये द्यावे लागतील असे हजारे याने सदर व्यवस्थापकास सांगितले. तडजोडीअंती 5 हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

म्हणून त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने शुक्रवारी (दि. 3) पडताळणी केली. त्यानंतर शनिवारी (दि. 4) कवडीपाट टोलनाका (कदमवाकवस्ती, ता हवेली) जवळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे हजारे याने 5 हजार रूपये लाच स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.