येळकोट… येळकोट… जय मल्हार..! जेजुरीत चंपाषष्ठीनिमित्त मल्हार महोत्सव

मान्यवरांच्या उपस्थितीत तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम

जेजुरी  – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाला रविवार (दि. 5) प्रारंभ होत आहे. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने यंदापासून चंपाषष्ठीनिमित्त सोमवार (दि. 6) ते बुधवार (दि. 8) मल्हार महोत्सवाचे आयोजन पालखी मैदान येथे करण्यात आले आहे.

यावेळी श्रींची पहाटेची भूपाळी आरती झाल्यानंतर मुख्य मंदिरात पाकाळणी होऊन नित्य वारकरी, सेवेकरी पुजारी यांच्या हस्ते उत्सवमूर्तींना पोशाख परिधान करून धार्मिक वातावरणात सकाळच्या सुमारास बालद्वारी – रंगमहाल येथे विधिवत घटस्थापना होऊन खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ होणार आहे.

यानंतर देवसंस्थानच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या अद्ययावत म्हाळसा – बाणाई अन्नसेवा कक्षाचे लोकार्पण जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी वर्गाच्या हस्ते करण्यात येणार आहे.तसेच पुजारी, सेवेकरी वर्गाच्या वतीने सहा दिवस चालणाऱ्या उत्सवात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गडकोट आवार मंदिराला विद्युत रोषणाई तर मुख्य मंदिर गाभारा पाने फुले फळांनी सजविण्यात येणार आहे. यानिमित्त सोमवारी (दि. 6) सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात होणार असून आमदार संजय जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन तर प्रमुख पाहुणे माजी आमदार विनायक निम्हण, नगराध्यक्षा वीणा सोनवणे आदी उपस्थित असणार आहेत.

मंगळवारी (दि. 7) पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्‍त सुधीर बुक्‍के यांच्या अध्यक्षतेखाली म्युझिक इंडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक उमेश तावसकर उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी (दि. 8) प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राची पारंपरिक अभंग ते लावणी हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तहसीलदार रुपाली सरनोबत, मुख्याधिकारी पूनम शिंदे, कवी आकाश सोनवणे, भूमीअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विकास गोफणे आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रमुख विश्‍वस्त पंकज निकुडे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.