पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाने 131 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा वर्षी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना मंगळवारी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी करण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी ही माहिती दिली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मंगळवारी प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून, श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर लावण्यात येणार आहेत. उत्सवमंडपात दुपारी 12 वाजेपासून मंदिर खुले केले जाणार आहे.
अन्य उपक्रम…
- दि. 20 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता
- 31 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण
- 20 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 21 सप्टेंबर पहाटे तीनपर्यंत
- “हरी जागर’ हा वारकरी मंडळाचा कार्यक्रम
- उत्सव मंडपात रोजचे अभिषेक आणि
- सामूहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन
- जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत
- तीन ठिकाणी केंद्र आणि रुग्णवाहिका सेवा
- गणेशभक्तांसाठी 50 कोटी रुपयांचा विमा
- उत्सवावर तब्बल 150 सीसीटीव्हींचा वॉच
- पाच एलईडी स्क्रीन, ऑनलाइन दर्शनाची सोय
योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडप सजावटीच्या उद्घाटनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याशी याविषयी बोलणे झाले असून, शनिवारी अथवा रविवारपर्यंत त्यांचा निर्णय कळवला जाईल. मंगळवारी सायंकाळी सात वाजता या सजावटीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असे यावेळी सांगण्यात आले.