मुंबई – बहुचर्चित दगडी चाळच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांची आतुरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोस्टरसह चित्रपटातील धमाकेदार आयटम सॉंग रिलीज झाल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये डॅडी अर्थात मकरंद देशपांडेंचा जोरदार दरारा पाहायला मिळतोय.
मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित असलेला दगडी चाळ हा चित्रपटात प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. त्यानंतर दुसऱ्या पार्टची प्रतीक्षा शिगेला पोहचली होती. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरींसह मकरंद देशपांडेची तुफान जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. गॅंगवॉरमधून बाहेर पडलेला सूर्या आणि डॅडीला पडलेली गरज यामुळे दोघांमध्ये निर्माण होणार संघर्ष चित्रपटातून उलगडणार असल्याचे ट्रेलरवरून समजते.
‘चुकीला माफी नाही’ या डायलॉगचा दरारा दुसऱ्या भागातही पाहायला मिळतो शिवाय ‘चाळीचे दरवाजे इतके कमजोर नाहीत की उभं राहायला वाऱ्याचा आधार घेतील’, ‘चाळ काही विसरत नसते’ अशा भारदस्त संवादफेकीमधील डॅडी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालणार हे शुद्ध स्पष्ट झालं आहे.
‘शंभो’ या शब्दाचा संगीतासाठी केलेला वापर ट्रेलरमध्ये खूप प्रभावी वाटतोय. हा चित्रपट येत्या १९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.