मुंबई – मुंबईमधील लालबाग परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले असून जखमींना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर आहे.
ही दुर्घटना लालबागमधील गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीच्या दुस-या मजल्यावर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गॅस गळती होत होती. याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर गॅस गळतीचा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी स्थानिक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी इमारतीत गेले असता अचानक स्फोट झाला.
या स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याने 16 जण जखमी झाले आहे. यात 3 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांवर केईम अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर चार जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका अल्पवयीन मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर भायखळा येथील मसिना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे. पण नेमकी गॅस गळती का झाली, हे अद्याप मात्र कळू शकले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईम रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली.