पुणे – करोनासंदर्भातील वैद्यकीय मदत तसेच “तौत्के’ चक्रीवादळ अशा दुहेरी आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी हवाई दलाने 34 विमाने सज्ज ठेवली आहेत. यामध्ये 16 मालवाहू, तर 18 हेलिकॉप्टरचा समावेश आहे.
याबाबत हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, “तौत्के’ चक्रीवादळामुळे देशाच्या पाश्चिम किनारपट्टीवरील राज्यांवर मोठा प्रभाव होणार आहे. या स्थितीत आवश्यक मदत पोहचवण्यासाठी हवाई दल सज्ज झाले आहे. या चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसांत पाश्सिम किनारपट्टी भागातील कोविडविषयक मदतकार्य प्रभावित होण्याची शक्यता असल्याने, त्यापूर्वीच मदतकार्य वेगाने केले जाईल, याची दक्षता दलाकडून घेण्यात येत आहे.
या मदतकार्यासाठी हवाई दलाच्या आयएल-76 आणि सी-130 ही विमाने सज्ज केली असून, आतापर्यंत आयएल-76द्वारे भटिंडा ते जामनगर येथे 127 व्यक्ती आणि 11 टन माल पोहचवण्यात आला. त्याचप्रमाणे सी-130 या विमानाद्वारे भुवनेश्वर ते जामनगर येथे 126 व्यक्ती आणि 14 टन मालाची वाहतूक करण्यात आली. तर भाटिंडा ते राजकोट यादरम्यान 15 व्यक्ती आणि 12.3 टन माल वाहतूक करण्यात आली. या व्यतिरिक्त इतर भागांमध्येही मदतकार्य पोहचविण्यासाठी हवाई दल कार्यरत आहे.