ओटीपी मागून महिलेला एक लाख रुपयांना गंडा

शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

सातारा – एका अनोळखी इसमाने मोबाइल करून अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगत एका महिलेचा क्रेडिट कार्डचा क्रमांक मागून घेतला. त्यानंतर तिच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मागून घेत महिलेच्या बँक खात्यावर तीन वेळा ऑनलाइन व्यवहार करून 1 लाख 7 हजार 335 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 15 मार्च रोजी यातील तक्रारदार महिला तृप्ती प्रसन्न साळुंखे (वय 27), रा. करंजे, सातारा यांना एका 88211058334 व 88291071256 या मोबाईल क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने साळुंखे यांना अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले तसेच तुमच्या क्रेडिट कार्डाचे लिमिट वाढवण्यासाठी आकर्षक योजना असून त्यांना 9 हजार 500 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर मिळणार असल्याचे सांगितले.

साळुंखे यांच्याकडून अनोळखीने क्रेडिट कार्डाचे शेवटचे चार अंक व त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी विचारून घेतला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने दि. 15, 16 व 18 मार्च रोजी तीन ट्रांझेक्शन करून साळुंखे यांच्या बँक खात्यावरून 1 लाख 7 हजार 335 रुपये त्याच्या अकौंटवर वर्ग करून त्यांची फसवणूक केली.

याबाबत साळुंखे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनोळखीवर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह़्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.