…आता पुन्हा चूल कशी पेटणार? व्यावसायिकांना चिंता

पुणे – करोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर कडक निर्बंध लागू केले. मात्र, याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. याशिवाय हॉटेलमधील सुमारे 50 टक्के कामगार मूळगावी परतले आहेत. यापूर्वी देखील आर्थिक नुकसान झाले होते. मागील काही महिन्यांत उभारी घेत असणारा व्यवसाय पुन्हा एकदा डबघाईला आल्याने, आता पुन्हा उभे कसे राहणार, ही चिंता हॉटेल व्यावसायिकांना सतावत आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारपासून शहरात कडक निर्बंध लावण्यात आले. यामध्ये खाद्यप्रेमींसाठी पर्वणी असणारा “हॉटेल व्यवसाय’ देखील अपवाद नाही. विविध पदार्थ खिलवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून सरकारच्या नियमांमुळे व्यवसाय करायचा कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पुणे शहरात सुमारे साडेआठ हजार हॉटेल आहेत. यामध्ये सुमारे सव्वा लाख कामगार वर्ग आहे. या सर्व हॉटेल्सची रोजची सरासरी उलाढाल सुमारे 6 कोटी रुपयांवर आहे. राज्यासह उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक या राज्यांतील कामगार हॉटेल क्षेत्रात आहेत. लॉकडाऊनच्या धास्तीने या कामगारांनी पुन्हा मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी
‘नवीन निर्बंधांनुसार कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, हा मुद्दा अडचणीचा आहे. कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण आम्ही स्वखर्चाने करायला तयार आहोत. मात्र, यासाठी सरकारने सरसकट लसीकरणाला परवानगी देण्याची आवश्‍यकता आहे, असे गणेश शेट्टी यांनी नमूद केले.

लॉकडाऊन हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. लॉकडाऊनच्या वेळात बदल करण्याबाबत यापूर्वी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिले आहे. मागील लॉकडाऊनमध्ये देखील तब्बल आठ महिने आमचा व्यवसाय बंद होता. त्यानंतर सुमारे 30 ते 35 टक्के व्यवसाय झाला. त्यावेळचे पैसे, हॉटेलचे भाडे, कर द्यायचे बाकी आहेत. यापूर्वी अनलॉकनंतर आम्ही काही जणांनी कामगारांना विमानाने परत आणले. मात्र, आता हे लॉकडाऊन किती दिवस सुरू राहील माहिती नाही. याशिवाय या निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय पुन्हा कसा उभा राहणार आहे, याबाबत साशंकताच आहे. सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. मात्र, कर किंवा अन्य बाबींमधून आम्हांला सरकारला पैसे द्यावे लागत आहेत. त्यातून आम्हाला कोणतीही सूट मिळाली नाही. हॉटेल व्यवसायाला सरकारने परवानगी द्यावी.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍन्ड हॉटेलियर्स असोसिएशन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.