बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाने बलाढ्य सिंगापूरचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या अंतिम सामन्यात भारताच्या अचंता शरथ कमलला पराभव पत्करावा लागला मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूंनीच वर्चस्व राखत इतिहास रचला.
याच खेळात गेल्या स्पर्धेतही भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. एकेरीतील पहिल्याच सामन्यात अचंताचा सिंगापूरच्या झहे यू चेव्हने 11-7, 12-14, 11-9 असा पराभव केला.
त्यानंतर सत्येन गणसेकरन व हरमीत देसाईने एकेरीचे नंतरचे सामने जिंकत सिंगापूरवर दडपण आणले. त्यानंतर झालेल्या सामन्यात हरमीत देसाई आणि साथियन जी या जोडीने सिंगापूरच्या योंग क्वेक आणि येव पॅंग यांचा 13-11, 11-7, 11-5 असा पराभव केला.
यावेळी भारत व सिंगापूर यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर सत्यन गणसेकरनने सिंगापूरच्या यू एन कोन पॅंगचा 12-10, 11-7, 11-7, 11-4 असा पराभव करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. हरमीत देसाईने झी यू क्लारेन्स चू याचा 11-8, 11-5, 11-6 असा एकतर्फी पराभव करत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.