World Cup 2023 IND vs ENG Match : भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 29 वा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने मैदानात उतरताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला. वास्तविक, कर्णधार म्हणून रोहितचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय(तीन्ही फॉरमॅट म्हणजे कसोटी, ODI आणि T20) सामना आहे.
रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा भारताचा सातवा खेळाडू ठरला आहे. याआधी महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच कर्णधार म्हणून 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित हा क्रिकेट जगातील 50 वा खेळाडू ठरला आहे.
सर्व भारतीय कर्णधारांचे रेकॉर्ड…
धोनी 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपदासह अव्वल स्थानावर आहे, तर अझरुद्दीनने 221 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. कोहलीने 213 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. गांगुलीने 195, कपिलने 108 आणि द्रविडने 104 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यापैकी फक्त धोनी आणि कोहली यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. अझरुद्दीन, गांगुली, कपिल आणि द्रविड यांच्या काळात फक्त दोनच फॉरमॅट (कसोटी आणि एकदिवसीय) असायचे.
कर्णधार म्हणून रोहितचा विक्रम…
कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. आतापर्यंत, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 99 पैकी 73 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत (इंग्लंडपूर्वी), तर 23 गमावले आहेत. तीन सामने ड्रॉ राहिले आहेत. विजयांच्या बाबतीत रोहितचा रेकॉर्ड कपिल आणि द्रविडपेक्षा सरस ठरला आहे.
रोहितने आतापर्यंत 51 टी-20 सामने, 39 एकदिवसीय आणि नऊ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नऊपैकी पाच कसोटी जिंकल्या आहेत, तर दोन गमावल्या आहेत. दोन कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली, 39 एकदिवसीय सामन्यांपैकी (इंग्लंडसह 40वे) भारताने 29 सामने जिंकले आहेत, तर 9 सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 51 पैकी 39 टी-20 सामने जिंकले आहेत, तर 12 सामने गमावले आहेत.