पाटणा – गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने या ठिकाणी निवृत्त पोलीस हवालदार परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वेच्छानिवृत्ती घेवून जदयूमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा अखेर पत्ता कट झाला आहे.
पांडे यांना जदयूने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी देवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
परशुराम चतुर्वेदी म्हणाले, गुप्तेश्वर पांडे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांच्या आदरपूर्वक पाया पडतो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकीशिवाय काहीच नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी भाजपाचे देखील आभार मानले.
दरम्यान, बिहार पोलिसात असताना चतुर्वेदी यांनी सीआयडीसह अनेक विभागात काम केले आहे.