“बाटा’ला ग्राहक मंचाचा दणका

कागदी पिशवीसाठी ग्राहकाकडे 3 रुपये मागणे पडले महागात
चंदीगढ – कागदी पिशवीसाठी ग्राहकाकडे तीन रुपयांची मागणी करणे चप्पल निर्मिती करणारी कंपनी “बाटा इंडिया लिमिटेड’ला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी न्यायालयाने सेवेत कुचराई केल्याचा ठपका ठेवत संबंधित ग्राहकाला नऊ हजार रुपये देण्याचे आदेश दिला आहेत.

चंदिगढचे रहिवासी दिनेश प्रसाद रतुरी यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली होती. ‘चंदिगढच्या सेक्‍टर 22डी मधील बाटाच्या दुकानातून मी 5 फेब्रुवारीला शूज खरेदी केले होते. कागदी पिशवीसह मला 402 रुपयांचे बिल आकारण्यात आले, असे रतुरी यांनी तक्रारीत म्हटले होते.

कागदी पिशवीसाठी पैसे आकारुन त्यावर बाटाने स्वतःच्या ब्रॅंडची जाहिरातही केली, असेही रतुरी यांनी नमूद केले होते. तीन रुपयांच्या रिफंडसह सेवेत कुचराई केल्याप्रकरणी नुकसानभरपाईची मागणीही त्यांनी केली होती. “बाटा’ने मात्र सेवेत कमतरता असल्याचे आरोप धुडकावून लावले.

ग्राहकांनी तुमच्या दुकानातील उत्पादन खरेदी केल्यास त्याला मोफत पिशवी देणे, हे तुमचं काम आहे’ असे सांगत ही सेवेत कुचराई असल्याचे ग्राहक मंचाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ग्राहकांना मोफत कागदी पिशव्या देण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहेत. पर्यावरणाची इतकीच काळजी असेल, तर मोफत पर्यावरणपूरक पिशव्या पुरवण्याचा सल्लाही मंचाने दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.