प्राचीन लढायांचा इतिहास उलगडणार

दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात जुना वीरगळ लेख उजेडात

सातारा – दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत जुना लेख युक्त वीरगळ उजेडात आणण्यास अभ्यासकांना यश आले आहे. महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वीरगळलेख आजवर आढळून आले आहेत. मात्र, सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. गौतम काटकर आणि मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर यांनी कवठेमहांकाळ तालुक्‍यातील आगळगांव येथे 950 वर्षापूर्वीचा लेखयुक्त वीरगळ शोधून काढला आहे. दक्षिण महाराष्ट्रात प्राचीन काळी झालेल्या लढायांचा आणि राजवटींच्या संघर्ष उलगडणार आहे.

चालुक्‍यराजा दुसरा सोमेश्‍वर याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील योध्याला वीरमरण आले. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ वीरगळ तयार करुन त्याच्यावर हा लेख कोरून ठेवण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील हा कालोल्लेख असलेला सर्वात जुना लेख युक्त वीरगळ आहे. प्राचीन काळात एखादा वीर पुरूष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभ्या करतात. त्याला “वीरगळ’ म्हणतात. हे वीरगळ वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकीत केलेले असतात. अशा वीरगळावर खालच्या टप्प्यात संबंधीत वीर पुरूषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते.

अगदी वरील भागात सदराचा वीर शिवलिंग पूजा करताना दाखविलेला असते. वीरगळ हे महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योद्‌ध्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत त्याचे नांव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते. महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मिळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. खिद्रापूरचा वीरगळ लेख उत्तरकालीन शिलाहर राजवटीतील आहे. इतिहास अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे गेली अनेक वर्ष वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्‌यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. सदर वीरगळांसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. वीरगळांचा अभ्यास करीत असताना प्रा. गौतम काटकर आणि मानसिंग कुमठेकर यांना कवठेमहांकाळ तालुक्‍यातील आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापैकी एका वर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला.

सरचा लेख युक्त वीरगळ सुमारे पाच फुट उंचीचा आहे. खालील भागात एक वीर ढाल आणि तलवार घेऊन एका समुहाशी लढाई करताना दाखविला आहे. सदरच्या वीरगळावर वरील कलशाकृती भागावर आणि मधील टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळे कन्नड लिपीत लेख कोरला आहे. सदरच्या लेखात “चालुक्‍यनृपती दुसरा सोमेश्‍वर उर्फ भुवनेकमल्ल’ याच्या कारकिर्दीत आगळगांवच्या एका वीराची मोठ्या समुहाशी लढाई झाल्याचे आणि त्यात तो धारातिर्थी पडल्याचे म्हटले आहे. सदरच्या वीराचे नांव लेख अस्पष्ट असल्यामुळे समजू शकत नाही. गावकुसवाच्या तटावरून ही लढाई झाली. चालुक्‍यनृपती दुसरा सोमेश्‍वर उर्फ भुवनेकमल्ल याची कारकिर्द 1068 ते 1076 अशी अवघी आठ वर्षांची होती. त्याचा हा काळ अत्यंत धामधुमीचा होता. वेगवेगळ्या राजवटींबरोबर सातत्याने या काळात युध्द होत असल्याच्या नोंदी आहेत.

शिवाय सोमेश्‍वर याचा धाकटा भाऊ विक्रमादित्य यानेही सोमेश्‍वराविरोधात बंडखोरी केली होती. तोही सोमेश्‍वर याच्या ताब्यात असणाऱ्या मुलखांवर स्वाऱ्या करीत असे. आगळगावात सापडलेल्या या वीरगळ लेखावरुन अशीच कोणती तरी लढाई आगळगाव आणि परिसरात 950 वर्षांपूर्वी झाली असावी. या लढाईत आगळगावचा वीर धारातीर्थी पडला असावा. त्याच्या स्मरणार्थच हा वीरगळ आणि त्यावरील लेख कोरून ठेवण्यात आला आहे. या वीरगळ अभ्यासासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, बाळासाहेब निपाणे-पाटील, (मिरज) यांचे मार्गदर्शन लाभले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या वीरगळावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच या संदर्भातील संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहेत. वीरगळावरील या लेखाच्या संशोधनाने दक्षिण महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.