बीड – पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज आणखी एक विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मी कुणाला काम देऊ शकते? सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.
परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवात त्या बोलत होत्या.वादग्रस्त वक्त्यावरून झालेल्या ट्रोलिंगबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचे युद्ध आहे. ‘जुन्या काळातील युद्ध वेगळे होते. आता नव्या काळातील युद्ध वेगळे आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचे युद्ध वेगळे आहे. हे युद्ध सोशल मीडियावर लढले जाते, असे त्या म्हणाल्या.
या युद्धासाठी तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. हे सोशल मीडियाचे युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपले काम करत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
काकांनी देवीच्या कानात काय सांगितले, तर ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली. हे “एक तीर में, दो निशाण’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.