पुणे –महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे प्रभाग रचनेचे नकाशे इंग्लंड आणि अमेरिकेसह इतरही काही देशांत इंटरनेटवर पाहिले गेले आहेत. सुमारे 200 हून अधिक वेळा हे नकाशे पाहिले गेले असून, सर्वाधिक 156 वेळा अमेरिकेतून तर 28 वेळा इंग्लंड मधून हे नकाशे पालिकेच्या संकेतस्थळावर पाहिले गेले आहेत. ही माहिती महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून देण्यात आली.
महापालिकेची प्रभाग रचना मंगळवारी दुपारी 3 वाजता पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. त्यानंतर गेल्या दीड दिवसांत सुमारे 1 लाख 11 हजार जणांनी ही प्रभाग रचना महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहिली आहे. तर सुमारे 24 हजार 705 जणांनी ही प्रभाग रचना डाऊनलोड केली आहे.
अन्य देशांतही उत्कंठा
परदेशांतूनही सुमारे 200 जणांनी प्रभाग रचना पाहिल्याचे समोर आले आहे. त्यात, सर्वाधिक 156 वेळा अमेरिकेतून तर 28 वेळा इंग्लंडमधून प्रभाग रचना पाहण्यात आली आहे. तर सुमारे 25 हून अधिक जणांनी वेगवेगळ्या इतर देशांमधून प्रभाग रचना पाहिली आहे. पुण्यातील अनेक जण नोकरी तसेच व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त परदेशात गेलेले असले, तरी महापालिका निवडणुकांची आणि प्रभाग रचनेची उत्सूकता परदेशातील पुणेकरांनाही असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले आहे.