पुणे – असलेली प्रभाग रचना जाहीर झाली. आता धडधड आरक्षण जाहीर होण्याची आहे. त्यानंतरच कोणत्या विद्यमानाला पुन्हा लढता येईल आणि कोणाला घरी बसावे लागेल. कोणत्या इच्छुकाला संधी मिळेल या सगळ्याचे पत्ते उलगडले जाणार आहे. तुर्तास प्रभाग रचनेवर मात्र राज्यातील सत्तेच्या विरोधकांची अंतर्गत रित्या आगपाखड आणि सत्ताधाऱ्यांचे समर्थन हेच सध्या पहायला मिळत आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग हा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. अपवाद वगळता याठिकाणी कायमच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. आताही रवींद्र धंगेकर, विशाल धनवडे आणि वनराज आंदेकर वगळता सर्वच नगरसेवक हे भाजपचे आहेत. यामध्ये मुक्ता टिळक, धीरज घाटे, हेमंत रासने यांच्या शिवाय अन्यही पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे.
नव्या रचनेनुसार शनिवारपेठ – राजेंद्रनगर (प्रभाग 17), शनिवारवाडा-कसबापेठ (प्रभाग 18), महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट (प्रभाग 28), खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई (प्रभाग 29) आणि रास्तापेठ – केईएम हॉस्पिटल (प्रभाग 19) चा सुमारे अर्धा भाग हा कसबा विधानसभा मतदार संघात येतो. हे प्रभाग बहुतांश पेठांचे आहेत. सुमारे 14 जागा कसबा विधानसभा मतदारसंघात आता लढता येणार आहेत.
संपूर्ण शहरातीलच प्रभागांची जशी तोडफोड झाली, त्याला हा भागही अपवाद नाही. त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांची मारामारी या साडेचार प्रभागांमध्ये (पाचवा प्रभाग 19 अर्धा) दिसून येणार आहे. याशिवाय इच्छुक आणि पक्षाचे निष्ठावंत यांची लिस्ट वेगळीच पहावी लागणार आहे.
मोर्चेबांधणीला सुरुवात
या आधी आरक्षणे जाहीर होऊन प्रभागरचना जवळपास काहीच दिवसांच्या अंतराने होत असे. त्यामुळे आपल्याला कोठून लढण्यासाठी संधी आहे, याचा अंदाज विद्यमान आणि इच्छुकांना येत असे. परंतु आता प्रत्यक्षात प्रभाग तोडला, यापेक्षा आता आरक्षणे काय पडतील याची धाकधूक अनेक दिवस राहणार आहे. आरक्षणे जाहीर होण्याविषयी अद्याप कोणतेच संकेत राज्य सरकारकडून मिळाले नाहीत त्यामुळे ही धाकधूक किती दिवस राहणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी “वेट अँड वॉच’ न करता इच्छुकांनी मंगळवारपासून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.