पुणे –राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 26 नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत, असा दावा मीही करू शकतो. पण असले खोटे दावे करण्याची मला सवय नाही. घोडामैदान जवळ आले आहे, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला प्रत्युत्तर देऊन खुले आव्हान दिले. त्यामुळे प्रभागरचना जाहीर होताच पक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांचे कलगीतुरे रंगू लागले आहेत.
महापालिका निवडणुकीतील प्रारूप प्रभागरचना जाहिर झाल्या आणि इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांकडून आपल्याला कोणता प्रभाग “सेफ’ याची चाचपणी सुरू झाली. निवडणुका आल्यावर काही नगरसेवक व इच्छुक ज्या पक्षाची ताकद अधिक असल्याचे दिसून येते त्याठिकाणी “उडी’ मारतात. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे वारे होते, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसह अन्य पक्षातील इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राज्यातील सत्ता महाविकास आघाडीचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आघाडीचे बलाबल अधिक असू शकते, तसेच प्रभाग रचनेनंतर या पक्षात गेल्यावर आपल्याला फायदा होईल या विचाराने विद्यमानांसह इच्छुक पक्ष बदलण्याच्या तयारीला लागले आहेत.
प्रशांत जगताप यांनी केला आहे गौप्यस्फोट
प्रभागरचना जाहीर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यांनी भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर हे प्रवेश होणार असेही जगताप यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गळाला कोणते विद्यमान लागले याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यांनीही “डबल धमाका’ करत राष्ट्रवादी कॉग्रेसचे 26 नगरसेवक भाजपात येणार असे सांगतितले. मात्र, त्यानंतर असे मी बोलू शकतो, पण खोटे दावे करण्याची मला सवय नाही, घोडे मैदान लांब नाही असे सांगत राष्ट्रवादीला इशारा दिला.